उद्योग आणि राजकारण अशा दोन विभिन्न क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे भरारी घेण्याचं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. शिवाजीराव आढळराव पाटील हे अशाच भाग्यवंतांपैकी एक. हवेत भराऱ्या मारूनही पाय जमिनीवर असलेला नेता ही शिवाजीरावांची खरी ओळख.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिवनेरीच्या परिसरात शिवाजीरावांचा जन्म झाला. पुण्याजवळच्याच आंबेगाव तालुक्यात, ८ मे १९५६ रोजी श्री दत्तात्रय कोंडाजी आढळराव पाटील व सौ.चंद्रभागा दत्तात्रय आढळराव पाटील यांच्या कुटुंबामध्ये शिवाजीरावांचा जन्म झाला. एकत्र कुटुंबपद्धतीने नांदणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी गरिबीचे चटके खूप सोसले. लहानपणातच त्यांची कष्ट आणि हलाखीच्या परिस्थितीशी ओळख झाली.

आर्थिक ओढाताण पाचवीलाच पुजलेली. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी वडिलांना मदत व्हावी, या हेतूने शिवाजीरावांनी मुंबई गाठली. स्वप्नांच्या या नगरीत आपली स्वप्नेही पूर्ण करायचीच, या जिद्दीने शिवाजीराव झटत होते. शिकायची ओढ आणि पुस्तकांचे वेड या दोन्ही गोष्टींमुळेच खरं तर शिवाजीरावांची कारकिर्द घडली. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. एकीकडे नोकरी करतानाच त्यांनी दुसरीकडे शिक्षण आणि नवनवीन अनुभव घेण्याची संधी सोडली नाही. कोणतंही काम हलकं नसतं, ही गोष्ट कायम मनात बाळगून त्यांची वाटचाल सुरू होती. मग उदरनिर्वाहासाठी पेपर टाकायला लागोत, चित्रपटगृह किंवा एखाद्या संस्थामध्ये साध्या शिपायासारखी नोकरी करण्यातही त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. पडेल ते काम मेहनतीनं केलं आणि मन लावून केलं. एकीकडे हे सगळं सुरू असताना त्यांनी इंग्रजीला आपलंसं केलं. शिक्षण आणि अनुभवाच्या जोडीला इंग्रजीच्या सखोल अध्ययनाची जोड मिळाली.

नोकरी करताना मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर शिवाजीरावांनी व्यवसायात उतरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भारताच्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी स्वतंत्र व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. पंधरा ऑगस्ट १९७८ साली स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय शिवाजीरावांनी घेतला आणि अवघ्या साडेतीन हजार रुपयांच्या भांडवलावर ” Elmatronic Devices ” नावाची कंपनी सुरु केली.

दूरदृष्टी असलेला मनुष्य खूप पुढे जातो आणि अलौकिक कामगिरी करतो, असे म्हटले जाते. शिवाजीरावांच्या बाबतीत ही गोष्ट अगदी तंतोतंत खरी आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतात संगणकीकरणास प्रारंभ केला, तेव्हाच शिवाजीरावांनी काळाची गरज ओळखली आणि संगणकमुळे जगाच्या कार्यपद्धतीत कसे अमूलाग्र बदल घडणार आहेत हे लक्षात घेतले. परिस्थिती आणि आगामी आव्हानांचा अभ्यास करून त्यांनी ‘Dynalog’ ही कंपनी सुरू केली. त्या कंपनीमार्फत संगणकासाठीचे आवश्यक parts बनवण्यास सुरवात केली. ह्याच कंपनीने शिवाजीरावांना स्थैर्य, सुबत्ता आणि नावलौकिक मिळवून दिला. डायनालॉग ही शिवाजीरावांच्या डायनॅमिक नेतृत्त्वाची खरीखुरी ओळख आहे.

मग शिवाजीरावांनी मागे वळूनच पाहिले नाही. त्यांची १९९४ साली ‘जागतिक मराठा चेंबर्स ऑफ असोशिअशन’ च्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि जगातील अनेक मराठी उद्योजकांशी गाठीभेटी झाल्या. संवादाला सुरवात झाली. हळूहळू त्यांच्या भराऱ्यांनी अवघे विश्व व्यापून टाकले. शिवाजीरावांच्या अध्यक्षतेखाली १९९६ साली ९२ मराठी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने २५ दिवसांचा युरोप आणि अमेरिकेचा दौरा केला, क्षितीज सगळीकडून रुंदावत गेले. त्याला सीमांचे बंधन उरले नाही.

एक यशस्वी व्यावसायिक म्हणून स्थिरावल्यावर काही वेगळ्या भूमिकांची आव्हाने खुणावायला लागली. हिंदुत्वाबद्दलची निष्ठा, मातृभूमीबद्दल प्रेम आणि विधायक कार्य करण्याचे ध्येय उराशी बाळगून काम करणाऱ्या ‘शिवसेने’ शी संपर्क आला… आणि २४ फेब्रुवारी २००४ साली झालेल्या शिवसेना प्रवेशामुळे, त्यांना समाजाचे ऋण फेडण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली.

एक मराठी व्यावसायिक पहिल्यांदा निवडणूक लढला आणि वीस हजारांच्या मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आला. प्रतिकूल परिस्थितीत झगडत एका मराठी माणसाचा प्रवास सुरु होऊन आणि एक यशस्वी उद्योजक ते खासदार अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरु आहे.

आता शिवाजीराव तिसऱ्यांदा जनतेचा कौल आजमावणार आहेत. दहा वर्षांत केलेली भरीव कामे, गावागावात असलेला दांडगा जनसंपर्क, नागरिकांना सहजपणे भेटणारा नेता ही निर्माण झालेली ओळख, शिरूर मतदारसंघातील अनेक ज्येष्ठाश्रेष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांची ताकद या जोरावर शिवाजीराव लोकसभा विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी उभे आहेत.

तुळजाभवानी आणि छत्रपती शिवराय यांच्या आशीर्वादाच्या जोरावर शिवाजीराव हॅटट्रिकचे स्वप्न साकारतील, याबद्दल मतदारांच्या मनात अजिबात शंका नाही.

संदर्भः अनाहत